Jivdani Darshan

jivdani road, Virar, 401305
Jivdani Darshan Jivdani Darshan is one of the popular Hindu Temple located in jivdani road ,Virar listed under Hindu Temple in Virar ,

Contact Details & Working Hours

More about Jivdani Darshan

सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यम्बके गौरी जिवदानी नमोस्तुते।।
मुंबईज वळच्या विरारची जीवदानी देवी ज्या डोंगरावर निवास करते, तो शिवकालातला जीवधन किल्ला आहे. आज हा परिसर हिरवागार झाला आहे. हे लाखो भक्तांच्या श्रद्धेचे स्थान आहे. नव्याने झालेली भव्य इमारत आणि ट्रस्टची अनेक सामा​जिक कामे, अशा प्रसन्न वातावरणात भाविकांना जीवनदानीची वाढती ओढ लागते आहे.
विरार पूर्वेला रेल्वे स्टेशनपासून दीड किलोमीटर अंतरावर जीवदानी डोंगर आहे. आज जीवदानीचा डोंगर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या या गडावर १७ व्या शतकाच्या सुमारास जीवधन किल्ला होता.येथे आज तटाचे काही कोरीव दगड आढळतात. कालौघात या ऐतिहासिक किल्ल्याचे अस्तित्व नष्ट झाले. अज्ञात शिल्पकारांनी तयार केलेल्या गुंफा आजही येथे आहेत. हे पांडवकालीन मंदिर असल्याचे भाविक सांगतात. श्री जीवदानी ही विरारची ग्रामदेवता असली तरी या स्थानाची कीर्ती राज्यभर पसरली आहे आणि भक्तिमार्गाच्या पाऊलखुणा अभिमानाने मिरवते आहे.
मातेच्या वास्तव्याच्या अनेक आख्यायिका आहेत.गडाच्या पायथ्याशी शेतात अनोळखी गाय नित्यनेमाने चरण्यासाठी येत असे.पण ती गाय कोणाची हे समजले नाही. दिवसभर ती चरायची आणि संध्यासमयी निघून जायची. एक दिवस शेताचा मालक त्या गायीच्या पाठोपाठ जाऊ लागला. ती गाय पूर्वेकडील डोंगरावर चढू लागली. तसा तोही डोंगर चढून गेला. डोंगरावर जिथे मैदानी जागा होती तिथे ती गाय थांबली. त्याचक्षणी तेजस्वी स्त्री तिथे प्रकटली. शेतकऱ्याला वाटले हीच त्या गायीची मालकीण असावी, त्याने तिच्याजवळ चाऱ्याचे पैसे मागितले. पैसे काढून त्या शेतकऱ्याच्या हातावर ठेवणार तोच तो म्हणाला, 'बाई, मी अस्पृश्य आहे. मला स्पर्श करू नकोस.' हे शब्द कानावर पडताच ती स्त्री नाहीशी झाली. शेतकरी अवाक् झाला. त्याचक्षणी गायीने हृदयविदारक हंबरडा फोडला आणि कड्यावरून स्वत:ला झोकून दिले. या बलिदानाचे रहस्य अजून कोणाला उलगडले नाही. पण तिने आपल्या जीवाचे दान केले म्हणून या डोंगराला जीवदानीचा डोंगर व तेथे वास करणारी आदिमाता म्हणून जीवदानी देवी प्रसिद्ध झाली. जीवदान देणारी देवी म्हणूनही भाविकांची श्रद्धा आहे.
१९४६ ते ५६ या काळात बारकीबाय नावाची भक्त रोज गडावर जाऊन नेमाने देवीची पूजा करीत असे. त्यानंतर १९५६ मध्ये देवीच्या भक्तांनी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली. सौम्य शीतल, प्रसन्न अशा या मूर्तीच्या डाव्या हाती कमलपुष्प आहे. तर उजव्या हाताने माता भाविकांना आशीर्वाद देत आहे. त्यापूर्वी देवीची लाकडी मूर्ती होती. २३ फेब्रुवारी १९५६ मध्ये जीवदानी मंदिर ट्रस्टची स्थापना झाली. सुरूवातीला कमी प्रमाणात भाविक येत. अरूंद पायवाट व कुठल्याही सुविधा नसलेले असे हे स्थान होते. हळुहळू मंदिराचा जीर्णोद्धार होत गेला. जुन्या मातीच्या पायऱ्या होत्या. त्यानंतर १९९१ मध्ये जवळपास सव्वा हजार सिमेंटच्या पायऱ्या बांधण्यात आल्या. या चढून उंचावरील जीवदानी मंदिरात जावे लागते. डोंगरावर चढताना दुतर्फा हिरवीगार वनराजी आहे. मंदिरात जाण्यासाठी पायऱ्यांशिवाय पाचपायरी हा जुना मार्ग असून येथून भाविक पायवाटेने जातात. विविध नवस करणे आणि ते फेडण्यासाठी भाविक आजही या मार्गाची निवड करतात. मार्ग डोंगराळ आहे. जवळपास २० वर्षांपूर्वी जीवदानी देवीचे भव्य मंदिर बांधण्याचे काम सुरू झाले. डोंगराच्या कुशीत उभी राहिलेली सात मजली इमारत बांधण्यास अनेक वर्षे लागली.देवीच्या मूर्तीसमोर भव्य सभामंडप असून त्यात पाच हजारांहून अधिक भाविक बसू शकतात. ५१ शक्तिपीठांपैकी हे एक. डोंगरावरील मंदिरात देवीची मनमोहक मूर्ती भाविकांचे मन वेधते.
पहाटे चारला मंदिर उघडल्यानंतर साडेपाचला काकडा, माध्यान्हीला व रात्री साडेसातला देवीची आरती होते. पहाटे अभिषेक व साजशृंगार होतो. मंगळवार, रविवार व सुटीला हजारो भाविक येतात. मंदिराच्या गर्भगृहाला लागून अरूंदशी श्रीकृष्ण गुहा आहे. शिवाय काळभैरव, महाकाली, बारोंडा मंदिरेही आहेत. तसेच गायगोठा व वाघोबा मंदिरे असून ती छोट्या गुंफेत आहेत. शेजारी पाण्याची कुंडे असून मानकुंड नावाने ती ओळखली जातात. पायथ्याशी असलेल्या श्री गणेश मंदिरात वंदन करून भाविक डोंगरावर येतात. नवरात्रीत तर लाखो भाविकांची गर्दी होते. शिवाय चैत्री नवरात्रही साजरे होते. मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यासह गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश अशा भागातून दर्शनासाठी भाविक येतात.या परिसराचा गेल्या काही वर्षांत कायापालट झाला आहे. परिसरात ९० सीसीटीव्ही असून इंटरनेटवर लाईव्ह दर्शन घेण्याचीही सोय आहे. डोंगरावर सात मजली इमारतीचे काम सुरू असताना दहा वर्षांपूर्वी बांधकाम साहित्य डोंगरावर नेण्यासाठी एक ट्रॉली सुरू झाली. तिचे रूपांतर रोपवेमध्ये झाले आहे. आज पायथा ते डोंगरावर जाण्यासाठी दोन 'रोप-वे' आहेत. या रोपवेमधून ज्येष्ठ नागरिकांसह इतर लोकही जाण्याचा आनंद घेतात. सामान्य भाविकांप्रमाणे अनेक व्हीआयपी भाविकही दर्शनासाठी येत असतात. जीवदानीचा डोंगर हरित ठेवण्यासाठी ट्रस्ट दरवर्षी वृक्षलागवडीसाठी मोठा खर्च करत आहे. ट्रस्टच्या पाच मोबाईल अॅम्ब्युलन्स असून या गावोगावी जाऊन आरोग्यसेवा पुरवितात. मंदिर पायथ्याशी ट्रस्टचा दवाखाना सुरू आहे. मंदिरात जमा होणाऱ्या निर्माल्यातून खतनिर्मिती केली जाते. तसेच, देवीला हजारो भाविक नारळ अर्पण करतात. त्यातून नारळवडीचा प्रसाद भाविकांना दिला जातो. ट्रस्टच्या वतीने दहा रूपयात घरगुती पोटभर जेवणही येथे भाविकांना दिले जाते. दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी पार्किंगची पुरेशी सोय आहे. ट्रस्टने गडावर कोंबड्या किंवा बकरे कापण्यास बंदी घातली आहे. नवरात्रात मंदिराला विद्युत रोषणाई आणि दरदिवशी फुलांची आकर्षक सजावट केली जाते.

Map of Jivdani Darshan