Aamch Parola

बालाजी मंदीर, पारोळा, Parola, 425111
Aamch Parola Aamch Parola is one of the popular Region located in बालाजी मंदीर, पारोळा ,Parola listed under City in Parola , Landmark in Parola ,

Contact Details & Working Hours

More about Aamch Parola

गावाचे भौगोलिक स्थान – रेखांशावर असलेले पारोळे हे गाव जळगाव जिल्ह्यातील तालुक्याचे मुख्या ठिकाण असून मुंबई, नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर धुळे व जळगाव जिल्ह्याच्या मधभागी वसलेले आहे. त्याचे क्षेत्राफळ १.४५ चौ. मैल आहे. समुद्रासपाटीपासून पारोळे गावाची उंची ६०८ फूट आहे. येथील पावसाचे मान वाषिक २० फूट ते २५ फूट आहे. आरोग्याच्या दृष्टीने हवा कोरडी व चांगली मानवणारी आहे. १८८१ च्या जनगणनेप्रामाणे गावाची हल्लीची लोकसंख्या २५००० आहे.
पारोळे नावाची उत्पत्ती – गाव चौकोनात बसविले असून त्यातील रस्ते रुंद, लांबच लांब व सरळ रेषेत दिसतात. या रस्त्यांवर मधून मधून पिंपळाचे व लहान लहान देवतांचे पार रांगेने म्हाणजे ओळीने बांधलेले आढळून येतात. म्हाणूनच या गावास पारांच्या ‘ओळी’ ‘पारोळी’ व नंतर अपभ्रंश होऊन ‘पारोळे’ हे नाव पडले.
गावाची सुरुवात व पूर्वेइतिहास - इतिहासाच्या पुराणावरुन या गावाची सुरुवात सुमारे २६० वर्षांपूर्वी किल्ला बांधणीच्यावेळी झाली असावी असे वाटते. पन्नास घराचे खेडे असलेले गाव जहागीरदार हरी सदाशिव दामोदर यांनी तटबंदी असलेल्या शहरापर्यंत ब्रिटीश राजवटीच्या प्रारंभी उर्जीतावस्थेला आणलेले असावे. कारण किल्ला ज्या ठिकाणी बांधला आहे त्या ठिकाणी ५० घरांची पेंढारांची वस्ती येथे होती. त्याचा पुरावा म्हणून गावाचा एक भाग पेंढारपूरा म्हणून आजही प्रसिद्ध आहे. नंतर किल्ल्याच्या अनुषंगाने हळूहळू वाढत गेली. किल्लेदारांनी व्यापारांचे मन वळवून त्यांना आश्रय दिला. त्यांच्या व्यापारास उत्तेजन व संरक्षन दिले. अशातरहेने पेशव्यांचे सरदार नेवाळकरांच्या कारकिर्दीत हे गाव त्या काळी व्यापारीपेठ म्हणून भरभराटीस आले. परंतु, पुढे इ.स. १८१८ मध्ये इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव केला. त्यामुळे शिवाजीने स्थापलेले हिंदवी स्वराज्य लयास गेले. सारया महाराष्ट्रात इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली. अशा परिस्थितीतही इ.स. १८२१ साली पारोळे गावी व आसपासच्या परिसरात इंग्रज राजवटीविरुद्ध भयंकर असंतोष निर्माण होऊन बंड उदभवले. कॅप्टन ब्रिग्ज याच्या खूनाचाही प्रयत्न झाला. त्याचा परिणाम म्हणून जहागीरदारावर ब्रिटीश सत्तेचा ओढवला. कॅप्टन ब्रिग्ज याने किल्ला जिंकला व तो बळजबरीने जहागीरदारास सोडावयास भाग पाडला. पुढे इ. स. १८५७ च्या स्वातंत्र्य युध्दात झाशीच्या राणीस पारोळ्याच्या किल्लेदारांनी इंग्रजांविरुद्ध मदत केल्याचा आरोप ठेवण्यात आला व राणीचे नातलग म्हणून इ. स. १८५९ मध्ये त्यांच्या ताब्यातून किल्ला व शहर इंग्रजांनी घेतले. इ. स. १८६० मध्ये जहागीरी खालसा केल्यामुळे हे गाव जहागीरीतून कमी झाले. इ. स. १८६४ मध्ये नगरपालिकेची स्थापना होऊन त्यामार्फत गावाचा कारभार सुरू झाला.
गावाची ऎतिहासिक प्रसिद्धी - पारोळे वीरांची वीरभूमी - "पूर्व दिव्य ज्यांचे, त्यांना रम्य भावीकाल, बोध हाच इतिहासाचा सदा सर्वकाळ..." ज्या राष्ट्राचा पूर्वेइतिहास भव्य दिव्य असतो त्याचा भविष्यकाळ उज्वल व उत्कर्षाचा असतो; असा या पद्यपंक्तिचा अर्थ आहे. राष्ट्राच्या जीवनातील हा सिद्धांत गावालादेखील लागू आहे. यादृष्टीने विचार केला असता पारोळ्यासदेखील अशीच प्रेरणा देणारी, आम्हास भूषणावह असणारी आमच्या मनास कार्यप्रवृत्त करावयास लावणारी आणि विचाराला विवेकाने वागावयास लावणारी अशी इतिहासाची परंपरा आहे. कारण झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे माहेर व सासरचा उभय नात्यांशी संबंधीत असलेली पारोळ्याची ही वीरप्रसवाभूमी ! राणी लक्ष्मीबाई ही तांबेकूल वीरश्री ! तिच्या माहेरशी संबंधीत असलेले तांबे घराण्याचे वंशज अजूनही पारोळे गावी वस्ती करून आहेत. त्याचप्रमाणे सासरच्या नात्याकडून राणी लक्ष्मीबाई म्हणजे नेवाळकरांची कीर्ती ! अन नेवाळकर पेशव्यांचे सरदार ! त्यांचे जहागीरीतील हे गाव ! या नेवाळकरांनीच १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धात राणी लक्ष्मीबाईस इंग्रजांविरुद्ध मदत केली. असे हे १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धाशी निगडीत असलेले ऎतिहासिक पूर्वपरंपरा असलेले इतिहास प्रसिद्ध पारोळे शहर !
गावाचे मुख्य आकर्षण - भुईकोट किल्ला एक ऎतिहासिक स्थळ - पारोळे गावात येणारया प्रवाशांस गावाजवळ येताच इतिहास प्रसिद्ध अशा मजबूत तटबंदीत असलेल्या भुईकोट किल्ल्याचे प्रथम दर्शन घडते. हा किल्ला म्हणजे गावाचे मुख्य आकर्षण होय. खानदेशामधील अत्यंत सुंदर व वास्तुशास्त्राचा अवशेषांपैकी वैभवाची आठवण करून देणारे स्थापत्यशास्त्राचे सर्वात सुंदर शिल्प म्हणजे पारोळ्यातील या भुईकोट किल्ल्याच्या अवशेषाकडे बोट दाखविता येईल. हा किल्ला सपाट मैदानावर असून इ.स. १७२७ मध्ये जहागिरदार हरी सदाशिव दामोदर यांनी बांधला. ५२५ फूट लांब व ४३५ फूट रूंद आहे. किल्ल्याच्या तटाभोवती सर्व बाजूने पाण्याचे खंदक आहेत. पूर्वेस एक मोठा रूंद असा तलाव असून त्याला तीनही बाजूंनी पायरया आहेत. किल्ल्याचेभोवती दगड चुन्याने बांधलेला असा एक व आतील बाजूस दुसरा असा तट आहे. किल्ल्याचे प्रवेशद्वार पूर्वी एका लाकडी झुलत्या पुलाने व विशाल अशा उत्तुंग बुरूजांनी संरक्षिले होते. या लाकडी पुलावरुन पूर्वी किल्ल्यात जाता येत असे. नंतर दगडी बुरुज आहे. जहागिरदारांचा महाल आहे. किल्ल्यात अनेक लहान लहान विहिरी आहेत. किल्ल्याच्या तटाच्या भिंतीत व बुरुजात अनेक लहानमोठी छिद्रे असून त्यातून येणारया शत्रूवर बंदूकीच्या गोळ्यांचा अचूक मारा करता येत असे. किल्ल्यात एक भुयार घर आहे. ज्यातून एक घोडेस्वार जाऊ शकेल इतके ते लांब, रूंद व उंच असे मजबूत बांधणीचे असून त्याचे प्रवेशद्वार गावापासून ५ मैलावर असलेल्या नागेश्वर येथील महादेवाच्या मंदीराजवळ आहे. या किल्ल्यात प्राचीन असे एक महादेवाचे मंदीर असून ते ‘हर हर महादेव’ या रणगर्जनेचे मराठ्यांचे स्फुर्तीस्थान आहे. हा किल्ला म्हणजे पारोळ्यांचे भूषण ! इतिहासाची परंपरा लाभलेले हे स्थळ म्हणजे पारोळ्याचे वैभव ! इतर स्थळे - गावाच्या बाहेर अनेक जुन्या मशिदी आहेत. किल्ल्याच्या जवळच एक सुंदर असा मनोरा आहे. किल्ल्याच्या पूर्वबाजूला इमाम बादशहाचा दर्गा आहे. त्यात इमाम व बादशहा या दोन भावांच्या कबरी आहेत. हा दर्गा ३१ चोरस फूट आकाराचा व १५ फूट उंच आहे. मध्यभागी मोठा घुमट असून चारही कोपरयाला चार लहान लहान घुमट आहेत. हा दर्गा हिंदू जहागिरदार सदाशिव दामोदर यांनी बांधला असे म्हणतात. दरवर्षी श्रावण महिन्यात तीन दिवस या दर्ग्याचा ऊरुस भरतो. दिल्ली दरवाज्यापासून वीस यार्डावर मिस्किनशा बाबा नावाच्या एका खुदाचे सेवकाचे एक रम्य स्मारक आहे. दिल्ली दरवाजा बांधकामातील ते एक कारागिर होते. ते एक "बहुत पहुचे हुए आदमी थे" या एका वाक्यात त्यांचे वर्णन केले तरी सार्थ आहे.
देवालयांची समृद्ध नगरी - पारोळ्याची भूमी ! मंदीरे व देवालये ही धर्म जागृतीची संघटनेची आणि संस्कृती जोपासनेची व संवर्धनाची साधने मानल्यास पारोळ्याच्या भूमीस हा सांस्कृतीक वारसा फार मोठ्या प्रमाणात लाभला आहे असे म्हणावयास हरकत नाही. प्राचीन देवालये आणि विविध धर्मपंथियांची श्रद्धास्थाने असलेला पारोळ्याचा परिसर महाराष्ट्रातील दूरवर विखुरलेल्या भाविकांचे मोठे आकर्षण होय. श्री बालाजी देवस्थान जनार्दन मंदीर श्रीराम मंदीर संतोषी माता मंदीर हिंगलाज माता मंदीर किल्ल्यातील महादेवाचे मंदीर स्वामी मंदीर विठ्ठल मंदीर श्री द्वारकाधीश मंदीर झपाट भवानी मंदीर पांडुरंग मंदीर
१) श्री बालाजी देवस्थान - अनेक भक्तांच्या नवसाला पावणारे व त्यांचे मनोरथ पूर्ण करणारे. सर्व लोकांचं श्रद्धास्थान बनलेले असे हे पारोळे गावाचे जागृत आराध्य दैवत म्हणजे श्री बालाजी महाराज ! बालाजी महाराजांचे हे देवस्थान सुमारे २४० वर्षांचे जुने आहे. गावाच्या मध्यभागी हे लोभनीय असे मंदीर असून त्याचा जीर्णोद्धार संवत १९८१ मध्ये श्री वल्लभदास मुरलीधर गुजराथी येवल्याचे गंगाराम छबीलदास पेढीच्या मालकाने तीस हजार रुपये खर्च करुन केला. हे देवस्थान नयन मनोहर असून मंदीराच्या आवारात एक प्रशस्त दगडी प्रवेशद्वार आहे. त्यावर एक नगारखाना आहे. मंदीरासमोरच एक गरुड खांब आहे आणि मंदिराच्या गाभारयात उच्चासनावर विराजमान झालेली ११ इंच उंच असलेली पंचधातुंची गिरीच्या बालाजीची सुबक अशी मूर्ती; दर्शन होताच क्षणभर डोळे दीपून टाकणारी अशी ही मूर्ती ! यात्रेच्यावेळी वाहनावरून बालाजीची ही छोटीशी जड मूर्ती प्रत्यक्ष चैतन्यमय होऊन जड होते. भक्तांच्या मस्तकावरून लवकर खाली येत नाही. हा चमत्कार दरवर्षी हजारो भाविक भक्त प्रत्यक्ष पाहतात. जीवनात आनंद व चैतन्य निर्माण करणारा श्री बालाजी महाराजांचा उत्सव दरवर्षी आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते पौर्णिमेपर्यंत मोठ्या उत्साहाने केला जातो. या पंधरा दिवसात मोठी यात्रा भरते. महाराष्ट्राच्या कानाकोपरयातून हजारो भाविक या उत्सवासाठी येतात व येथील श्री बालाजींची प्रेक्षणीय वाहने व रथ बघून डोळ्यांचे पारणे फेडून घेतात. श्री बालाजीची मंदीरे गावोगावी पुष्कळ असतील, पण या गावी साजरा केला जाणारा उत्सव एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात कोठेही आढळून येत नाही. या उत्सवात धर्मभावनेच्या जागृतीसाठी व समाज प्रबोधनासाठी नामवंतांची कथाकीर्तनेही आयोजित केली जातात हे उल्लेखनीय आहे. श्री बालाजीचा रथ महाराष्ट्रातील किंबहुना देशातील प्रसिद्ध असा रथ आहे. "वास्तुशास्त्र विशारदकांना विशेष अभ्यास करावयास लावणारा एक उत्कृष्ट रथ" या शब्दातच त्याचे महत्व सांगावे लागेल. १९६१ साली हल्लीच्या या रथाच्या जीर्णोद्धारासाठी प्रयत्न झालेत. त्यावेळी ७० हजार रुपयात हा ३५ फूट उंचीचा कित्येक टन वजनाचा लाकडी रथ श्री माधव रामजी मिस्त्री यांनी आपल्या बंधूंच्या मदतीने पूर्ण केला. शहरातील गैरसोयींचा विचार करून सर्व सुविधापूर्ण प्रशस्त असे मंगल कार्यालय उभारण्याचा मंदीराच्या विश्वस्तांचा संकल्प पूर्ण होत चालला आहे. ही देखील त्या बालाजी मंदीराची कृपा आहे. श्री बालाजी भक्त ‘गिरी शेट शिंपी’ यांचे स्मारक म्हणून ३३ फूट उंचीची गावाबाहेर स्मशानभूमीत पारोळे-धुळे रस्त्यावर एक सुंदर दगडी चुना विटांची १३ फूट चौरस आकाराची छ्त्री बांधलेली आहे. तेथे दरवर्षी भक्ताच्या भेटीला पालखीतून देव जात असतात. त्यामुळे पारोळ्याची स्मशानभूमी ही पावनभूमी बनली आहे. हल्ली भग्नावस्थेत असलेल्या या छ्त्रीचे नव्याने बांधकाम श्री बालाजी संस्थानाने सुरु केले आहे. ती वास्तूसुद्धा अतिसुंदर होणार हे निश्चित. अशा या श्री बालाजी संस्थानाचे पुजारयाचे काम गावातील पाठक घराण्याकडे आहे. पाठक घराणे निरपेक्ष नि:स्वार्थी बुद्धीने बालाजीची सेवा करणारे म्हणून लौकीकास पात्र ठरले आहे, हे अभिमानाने सांगावेसे वाटते.

Map of Aamch Parola